समृद्धी महामार्गावरील लुटमारप्रकरणी आणखी चार आरोपींना केली अटक

Foto
वैजापूर, (प्रतिनिधी) : समृद्धी महामार्गावर उद्योजक साहील सोनवणे यांना लुटमार केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आणखी चार आरोपींना अटक केली आहे. यापूर्वी या प्रकरणात सात आरोपींना पोलिसांनी अटक केली होती.

त्यामुळे या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींची संख्या ११ झाली आहे. उद्योजक सामील सोनवणे यांच्यासोबत समृद्धी महामार्गावर लुटमारीची घटना घडली होती. या प्रकरणाचा तपास वैजापूर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. पोलिसांनी तांत्रिक तपास तसेच मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. तपासादरम्यान आणखी जणांचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. 

गुन्ह्यातील फरार आरोपी ओमकार रामचंद्र फसले (२२) रा. म्हाळस जवळा, ता. जि. बीड हा गावातच लपून बसल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. ओमकार हा वाहन चालविण्याचे काम करीत होता. चार त्यामुळे पोलीसांनी ठेकेदार बनून वेशांतर करून म्हाळस जवळा ता. जि. बीड हे गाव गाठले. 

पोलिसांनी स्वतःची ओळख पूर्णपणे लपवत आपण रस्त्याचे काम करणारे ठेकेदार असल्याचे भासविले. गावातील एका पानटपरीवर थांबून सोलापूर धुळे रोडवर बीडजवळ उड्डाणपुलाचे काम सुरू असून तेथे मुरूम वाहतुकीसाठी टिपर चालविण्यासाठी चालकाची आवश्यकता असल्याचे पान टपरी चालकाला सांगितले.
पानटपरी चालकाने गावातील ओमकार फसले हा वाहन चालविण्याचे काम करतो, अशी माहिती दिली. यावेळी पानटपरी चालकानेच ओमकारसोबत असलेल्या त्याच्या मित्राला फोन केला.

गावातील पानटपरीवर रस्त्याचे काम करणारे ठेकेदार आले आहे. त्यांना टिपर चालविण्यासाठी चालकाची आवश्यकता आहे असे सांगितले. त्यामुळे ओमकार याने होकार दिला. तो सायंकाळी पानटपरीजवळ आला. ठेकेदाराच्या वेशातील पोलिसांनी ओमकार रामचंद्र फसले यास शिताफीने ताब्यात घेतले.

दुसऱ्या पथकाच्या तपासा दरम्यान दोन आरोपी छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर रोडने जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पथकाने कायगाव टोका परिसरात सापळा रचला. दोन आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांची नावे भिमराव उर्फ शहादेव भगवान तांदळे (२६) रा. एकनाथवाडी, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर आणि सुनील गणपत चव्हाण (२२) रा. दामुनाईक तांडा, पोस्ट पाचेगाव, ता. गेवराई, जि. बीड अशी सांगितली. 

गुन्ह्याबाबत सखोल चौकशी केली असता 4 त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तपासात आरोपी सुनील कल्याण शेंडगे (२६) रा. धाकलगाव, ता. अंबड, जि. जालना, ह.मु. रांजणगाव शेणपुंजी, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर याने गुन्हा करण्यासाठी स्वतःचे वाहन टोळीला दिल्याचे निष्पन्न झाले आहे.

शेंडगे हा मुख्य आरोपी परशुराम गायकवाड यांचा टोळीचा सक्रिय साथीदार असून ते गुटख्याच्या गाड्या लुटण्याचा सराईत आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अपोअ प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली उपोआ. भागवत फुंदे, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक विनय सोनवणे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. विजयसिंग राजपुत, स.पो. नि. वैभव रनखांब, पो.उपनि. लहू घोडे, महेश घुगे, भागीनाथ वाघ यांच्यासह तांत्रिक विश्लेषण विभागाचे प्रशांत सोनवणे, पो. उपनि. मेघा माळी, योगेश तरमळे व जीवन घोलप यांनी केली.